महिलांच्या लोकल प्रवासासाठी राज्य सरकारची रेल्वे बोर्डाकडे विनंती, रेल्वेकडून अद्याप ग्रीन सिग्नल नाही

मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारपासून मोनो आणि सोमवारपासून मेट्रो रेल्वे पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यातच आज राज्य सरकारने नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करून द्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे केली आहे

मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारपासून मोनो आणि सोमवारपासून मेट्रो रेल्वे पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यातच आज राज्य सरकारने नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करून द्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणती प्रतिक्रिया आलेली नसून, ज्यावेळी रेल्वे बोर्ड या विनंतीला मंजुरी देईल त्याच वेळी अधिकृतरित्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवास करता येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना सतरा तारखेपासून लोकलने प्रवास करता येईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज राज्य सरकारने रेल्वेकडे एक विनंती पत्र पाठवले गेले. या पत्राद्वारे अत्यावश्यक सेवेत नसलेल्या महिलांना लोकलने प्रवास करू द्यावा अशी विनंती करण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी ७ वाजल्या पासून ते शेवटच्या लोकल पर्यंत अशा मर्यादित वेळेत महिलांना लोकल प्रवास करू द्यावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी क्यूआर कोडची देखील आवश्यकता नाही असेही पत्रात म्हटले आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सर्वत्र महिलांनी आनंद व्यक्त केला. मात्र राज्य सरकार केवळ विनंती करत असून अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाच्या हातात आहे असे नंतर रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.