हे पूर्णपणे महापालिकेच्या निष्क्रीयतेचे बळी आहेत ; भांडुप परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर प्रविण दरेकर यांचा आरोप

मुंबईतील भांडुप परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या परिसराला भेट दिली असून मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. 

    मुंबई : मुंबईत काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईतील भांडुप परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या परिसराला भेट दिली असून मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत.

    हे पूर्णपणे महापालिकेच्या निष्क्रीयतेचे बळी आहेत. असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण मुंबईत पाऊस दरवर्षी पडतो. पाणी प्रचंड तुंबतं. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढता पाऊस येतो. मग अशा वेळेला तुंबणारी ठिकाणी कुठली? धोकादायक दरडी कुठल्या आणि आपल्याकडे सर्व डाटा असतो. केवळ आम्ही नोटीस चिटकवली म्हणजे जबाबदारी संपते का, अशा प्रकारचा संताप प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

    पुढे म्हणाले की, उद्या नोटीस जर चिटकवली तर त्यांनी कुठे राहायचं, खायचं काय, याची सगळी व्यवस्था जर लावली असती, तर ती लोकं शिफ्ट होतील. आता मृत्यूमुखी पडल्यावर सांगायचं की, आम्ही नोटीसा दिल्या होत्या. आमची जबाबदारी संपली. पाऊस मोठ्या प्रमाणावर आला, पावसावर ढकलंलं आमची जबाबदारी संपली. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तर आमची जबाबदारी संपली. तुम्हाला जबाबदारीपासून पळता येणार नाही. सर्वस्वी महापालिका या सर्व झालेल्या घटनेला जबाबदार आहे आणि मला वाटतं त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी. तसेच निदान येथून पुढे अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत. त्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा कार्यन्वीत करावी, अशी माझी हात जोडून त्यांना नम्र विनंती आहे. असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

    तुम्हाला या बातमी बद्दल काय वाटते? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…