फेरपरीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; मनसेची मागणी

फेर परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचण्याकरीता रेल्वे शिवाय अन्य पर्याय नाही. तरी अशा विद्यार्थ्यांना व पालकांना रेल्वे प्रवास करण्याकरीता परिक्षा कालावधीत विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी अशी मनसेची मागणी आहे.

मुंबई : राज्यासह मुंबईत दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा(hsc ssc return exam) सुरु झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परीक्षा काळात या विद्यार्थ्यांना तत्काळ रेल्वे प्रवास (Local travel) करण्याची मुभा द्यावी अशी मागणी मनसेने(MNS)  रेल्वे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई व उपनगरात शाळेत शिकवणारे शिक्षक, शिक्षिका व अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, परीक्षेस येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला नाही. अनेक विद्यार्थी उपनगरातून मुंबईत महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याने त्यांची परीक्षाही त्याच महाविद्यालयांच्या अनुषंगाने परीक्षा केंद्र आलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतरावरुन यावे लागते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी रेल्वेनेच प्रवास करत असतात. आता कोरोनामुळे रेल्वे सामान्य नागरिकांना बंद आहे. याच काळात आता दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. फेर परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचण्याकरीता रेल्वे शिवाय अन्य पर्याय नाही. तरी अशा विद्यार्थ्यांना व पालकांना रेल्वे प्रवास करण्याकरीता परिक्षा कालावधीत विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी.

उपनगरीय रेल्वे तिकीटांकरीता असलेल्या रांगेचा विचार करता या मुलांना खास बाब म्हणून त्यांच्या हॉल तिकीटवर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी अशी मागणी मनसेचे चेतन पेडणेकर यांनी सरकारकडे केली आहे.