लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा?

    मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, याच कोरोनामुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, राज्यातील ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्या नागरिकांना महाराष्ट्रात आरटीपीसीआर टेस्ट न करताच येण्याची परवानगी १५ जुलै रोजी राज्य सरकारने दिली आहे.

    त्यामुळे मुंबईतही ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी करत विलेपार्ले येथील रहिवाशी आणि चार्टर्ड अकाऊंटट असलेल्या मोहन भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.