सावधगिरीने पुढे जाण्याची गरज; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पॉझेटिव्हीटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्हयात केलेल्या  उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझेटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देश ही आरोग्य विभागाला दिले.

    मुंबई : कोरोनाच्या दोन लाटेमधील हा  काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन आपण काहीप्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी दिला आहे.   मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

    या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, बाल टास्कफोर्सचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    गर्दी होणार नाही दक्षता घ्या

    अजुन कोरोनाची दुसरी लाट पुर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतू याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करतांना सावधगिरीची पाऊले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत,  ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.  आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उदभवतात त्यात कोरोना  विषाणुचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सण समारंभ ही सुरु होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

    लसीकरणासाठी गावागावात जनजागृती

    मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सीजनच्या तयारीचाही आढावा घेतला त्यांनी ऑक्सीजन निर्मिती, ऑक्सीजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी यासर्वच प्रक्रियेतील वेग देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.  आशा- अंगणवाडीसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात जनजागृती करून कोराना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे  अशी सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की,  लसीचे दोन्ही डोस घेऊन कोराना बाधित होणाऱ्यांची संख्या, त्याची स्थिती आणि कारणे याचे टास्कफोर्सने विश्लेषण करावे, ही माहिती संकलित करतांना ती अनुभवजन्य राहील (लसीचा पहिला डोस घेतला होता की दोन्ही) याची काळजी घ्यावी.

    पॉझेटिव्हीटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्हयात केलेल्या  उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझेटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देश ही आरोग्य विभागाला दिले.