‘मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली’ अमरिंदर सिंग अमित शाह भेटीवर सामनाचे प्रश्न

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर अमरिंदर दिल्लीस आले. ‘‘भाजप नेत्यांना तुम्ही भेटणार काय?’’ या प्रश्नावर अमरिंदर म्हणाले, ‘‘मी भाजप नेत्यांना भेटणार नाही. दिल्लीत माझ्या सामानाची आवराआवर करायला आलो आहे.’’ पण लगेच दुसऱ्या दिवशी ते अमित शहांना भेटले.

    अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजप नेत्यांच्या भेटी आहेत. काल सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट भेतली. याभेटीमागे राष्ट्रीय सुरक्षा असल्याचं कारण सिंग यांनी सांगीतलं. याच कारणामुळं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ‘अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    काय म्हटलंय सामनात?

    आता मी काँग्रेसमध्ये थांबणार नाही व भाजपातही जाणार नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. कॅ. अमरिंदर हे भाजपात जाणार नाहीत, पण बाहेर राहून काँग्रेसचा घात करणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांनी ठरवलेले दिसते. पंजाबातील घडामोडींनी काँग्रेसचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर अमरिंदर दिल्लीस आले. ‘‘भाजप नेत्यांना तुम्ही भेटणार काय?’’ या प्रश्नावर अमरिंदर म्हणाले, ‘‘मी भाजप नेत्यांना भेटणार नाही. दिल्लीत माझ्या सामानाची आवराआवर करायला आलो आहे.’’ पण लगेच दुसऱ्या दिवशी ते अमित शहांना भेटले.

    केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंजाबच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना डावलून काँग्रेसने दूर केलेल्या व आमदारांचा पाठिंबा गमावलेल्या अमरिंदर सिंग यांच्याशी सीमा सुरक्षेबाबत चर्चा करणे बरोबर नाही. देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, पण अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय? मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली. देशाच्या गृहमंत्र्यांनाही त्याबद्दल जी बहुमोल माहिती मिळाली ती देशाला समजेल काय? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानेच अमरिंदर यांच्याप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते!