राज्य सरकार पत्रकारांच्या बाबतीत असंवेदनशील का ? अमृता फडणवीस यांनी विचारला सवाल

पत्रकारांबाबत राज्य सरकारला(State Government) एवढी असंवेदनशीलता का आहे?, पत्रकारांना(Journalists) फ्रंट लाईनचा(Frontline workers) दर्जा द्यायला पाहिजे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

  मुंबई: पत्रकारांबाबत राज्य सरकारला(State Government) एवढी असंवेदनशीलता का आहे?, पत्रकारांना(Journalists) फ्रंट लाईनचा(Frontline workers) दर्जा द्यायला पाहिजे. खूप विभाग आहेत, जिथे संवेदनशील पद्धतीने सरकारने मदत केली नाही, आपण त्यांचे लक्ष इथे वेधायला पाहिजे. जर ते ग्राऊंड लेव्हलवर उतरून काम करीत नसतील, तर सरकारमध्ये राहण्याचा काय फायदा आहे. अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील राज्य सरकारची हजेरी घेतली आहे.

  मी स्वत: लवकरच लस घेणार
  अमृता फडणवीस म्हणाल्या की, १५ ते २० दिवसात लस उपब्लध होतील, मी स्वत: लवकरच लस घेणार आहे. हे लसीकरण नवे आहे. बाहेरून आलेल्या लसीबाबत काही त्रुटी आहेत. उत्पादनाबाबत समस्या आहेत. त्यामुळे वेळ लागतो. ज्यांना लस मिळते आहे, त्यांना लवकर लस द्या. धारावी मधल्या लोकांना त्रास झाला, मात्र त्यांनी नियम पाळले आणि करून दाखविले आहे, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
  कलाकारांना मदत मिळाली पाहिजे

  त्या म्हणाल्या की, ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यामुळे ज्याला शक्य आहे, त्यांनी मदत करणे गरजेचे आहे. कलाकाराला खूप स्वाभिमान असतो, अशा दिवसात कलाकार आणि मुख्यतः बॅक स्टेज कलाकारांना आमच्या फाऊंडेशनच्या मार्फत शक्य ती मदत करीत आहोत. छोट्या कलाकारांचे पेमेंट अडकले आहेत. मोठ्या कलाकारांना पेमेंट मिळतो. मात्र छोट्या कलाकारांना मदत मिळाली पाहिजे, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी कलाकारांना मदतीचा हात दिला आहे.

  रेशनिंग किट वाटप
  अमृता फडणवीस यांनी मुंबईत धारावीमध्ये कलाकारांना रेशन किटचे वाटप केले. धारावीमध्ये दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी मुंबईच्या विविध भागातून लोक कलावंत आणि बॅक स्टेज कलाकार उपस्थित झाले होते. त्यांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते रेशनिंग किट वाटप करण्यात आले. यावेळी कलाकारांनी त्यांच्या व्यथा देखील मांडल्या. कलाकारांना अश्रूही अनावर झाले होते. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर प्रसार माध्यमांशी चर्चा केली.