uday samant

मुंबई : संपकाळातील संपुर्ण वेतन प्राध्यापकांना दिले जाईल, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती या विभाचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. ट्वीट करत त्यांनी ही खुशखबर दिली आहे. यामुळे रखडलेली प्राध्यापकांची वेतनाची रक्कम आता त्यांना मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील १२ हजार ५१५ प्राध्यापकांना होणार आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेली ही मागणी होती. त्यावर त्या संपकाळातील पूर्ण वेतन प्राध्यापकांना मिळेल, असे स्पष्ट करणारे ट्वीट राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे रखडलेली वेतनाची रक्कम प्राध्यापकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र प्राध्यापकांना संपकाळातील वेतन देण्यात येऊ नये, अशी भूमिका विद्यार्थी संघटनांनी घेतली आहे. नियमित प्राध्यापकांप्रमाणे तासिक तत्त्वावरील प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती वेळेत देण्यात यावी, अशी मागणीदेखील केली आहे.

राज्यातील प्राध्यापकांनी २०१३ साली ४ फेब्रुवारी ते १० मे असा सलग ७१ दिवस संप केला होता. या संपकाळातील प्राध्यापकांचे वेतन रोखून धरण्यात आले होते. त्यावर प्राध्यापकांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तीथेदेखील प्राध्यापकांच्या बाजूनेच निर्णय लागला. त्यामुळे प्राध्यापकांना त्यांचे थकित वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

सरकारवर १९१ कोटी ८१ लाखांचा भार

प्रत्येक पातळीवरील लढाईत प्राध्यापकांच्या बाजूनेच निर्णय लागल्यामुळे प्राध्यापकांना त्यांचे थकित वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आता या थकीत वेतनापोटी राज्य शासनावर १९१ कोटी ८१ लाख रुपयांचा भार पडणार आहे.

राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग देण्यासंदर्भातही येत्या चार दिवसांत निर्णय होणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगीतले.