मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान;  नाना पटोलेंचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो, त्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान आहे, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी  विरोधीपक्षाचा समाचार घेतला.

कंगना राणौत यांनी महाराष्ट्राबद्दल, मुंबईबद्दल आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक उद‍्गाराबाबत प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावाबाबत समितीला मुदत वाढ द्यावी या मुद्द्यावर सुधिर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर ते बोलत होते.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावरील समितीला मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव समितीचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर यांनी सभागृहात मांडला. त्यावेळी मुनगंटीवार यांनी काही मुद्दे उपस्थित केले.

त्या मुद्द्यांना सत्ताधारी पक्षांकडून आक्षेप घेत हा तर अध्यक्षांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. त्यावेळी पटोले यांनी हे मत व्यक्त केले.