अंधेरी पारसी पंचायत भुयारी मार्गाचे काम ६० टक्के पुर्ण

–  आमदार रविंद्र वायकर यांची माहिती ; रुपये १३ कोटी खर्चुन रुंदीकरणाचे काम पूर्ण करणार

मुंबई : अंधेरी पूर्व पश्‍चिम द्रुतगती महामार्गाखालील पारसी पंचायत येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यास उभारण्यात येणार्‍या महत्वाकांक्षी अशा येथील भुयारी मार्गाच्या वरच्या सरफेसचे काम प्रगतीपथावर असून जवळजवळ ६० टक्के पुर्ण झाले आहे. डिसेंबर २०२० पर्यंत वरच्या सरफेसचे काम पुर्ण करुन ब्रीजच्या खालील रुंदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. येथील पुलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले. 

गेल्या काही वर्षांमध्ये अंधेरी (पूर्व) येथील लोकसंख्येत वाढ झाल्याने येथील वाहतुकीच्या कोंडीत मोठयाप्रमाणात वाढ झाली होती. यातून येथील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांनी २०१२ मध्ये येथील पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम यांना विभागाला सादर केला होता. तत्कालिन सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र या कामाची निविदा काढण्यासाठी वेळ झाल्याने सरकारचा कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर २०१४ मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी या कामाचा पुन्हा पाठपुरावा केला. अखेर २१ डिसेंबर २०१५ रोजी या कामाचा शुभारंभ करण्याची मान्यता देण्यात आली. कामाला सुरूवात करताच ५ एप्रिल २०१६ रोजी वाहतूक पोलीस विभागाने व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकार्‍यांनी संयुक्त चर्चा केल्यानंतर चार टप्प्यात काम करण्याच्या प्रस्तावासही या दोन्ही विभागांनी असहमती दर्शविली.

 त्यामुळे हे काम पुन्हा रखडले. यानंतर सहपोलीस आयुक्त, वाहतूक यांनी २४ जानेवारी २०१६. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता व कंत्राटदार यांच्या समवेत जागेची संयुक्त पहाणी केल्यानंतर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम पुर्ण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ६ जुन २०१६ रोजी तसा प्रस्ताव तयार करुन तो शासना सादर करण्यात आला. परंतु तोपर्यंत या महामार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणास परवानगी देणे शक्य नसल्याचे सहपोलीस आयुक्त, वाहतुक यांच्याकडून कळविण्यात आले. मेट्रोचे काम पुर्ण झाल्यावर या कामास परवानगी देणे शक्य हेाईल, असेही वाहतुक विभागाने कळविले. वाहतुक विभागाची परवानगी मिळत नसल्याने रुंदीकरणाच्या कामास विलंब होत असल्याने, अधिक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ, कोकण भवन यांनी देखील २ डिसेंबर २०१६ रोजी या जागेची संयुक्त पहाणी करुन वाहतुक परवानी देण्यासंदर्भात वाहतुक पोलीस विभाग यांना परवानगी देण्यासंदर्भात फेरविचार करण्याची विनंती केली. 

परंतु मेट्रोच्या कामाचे कारण पुढे करीत वाहतुक पोलीस विभागाने या कामास परवानी देणे नाकारले. यामुळे या कामाचा करारनामा संपुष्टात आल्याने १३ एप्रिल २०१७ रोजी हा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आला. 

१८ महिन्यांमध्ये तीन टप्प्यांमध्ये याचे काम पुर्ण करण्यात येणार आहे. तब्बल १३ कोटी ३० लाख खर्च करुन या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती, गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली. कोरोनामुळे अनेक विकासकामांना चार महिने खिळ बसली होती. परंतु आता काही महत्वाकांक्षी विकासकामे पुनश्‍च सुरू करण्यास राज्य शासनाने परवानी दिल्यानंतर पारसी पंचायत येथील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पुनश्‍च सुरू करण्यात आले आहे. डिसेंबर २०२० पर्यंत वरच्या सरफेसचे काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून त्यानंतर ब्रिजच्या खालील रुंदीकरणाचे काम होती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार रविंद्र वायकर यांनी दिली.  

 

पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील पारसी पंचायत (पंपहाऊस) चे रूंदीकरण :

सद्यस्थिती लांबी,रुंदी       सुधारित लांबी, रुंदी

२० मीटर लांबी            ४० मीटर लांबी

१३ मीटर रुंदी            ३० मीटर रुंदी

४.५ मीटर उंची            ५.५ मीटर उंची