Anil Deshmukh case: अनिल देशमुखांना ईडीचे बजावलेले समन्स रद्द होणार? उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा देण्यास नकार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh ) यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबरला ऑनलाईन सुनावणी घेण्याचे निश्चित केले.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh ) यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबरला ऑनलाईन सुनावणी घेण्याचे निश्चित केले.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर असताना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच सीबीआय आणि ईडीमार्फत या प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरू आहे. त्यातच ईडीकडून आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाचवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

    मात्र, देशमुख ईडीपुढे वेळोवेळी हजर झालेले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली असून ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यात यावे, अशी मुख्य मागणी याचिकेतून केली आहे. त्या याचिकेवर न्या.सारंग कोतवाल आणि न्या.माधव जामदार यांच्या यांच्याखंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, खंडपीठाने ७ ऑक्टोंबरला ऑनलाईन सुनावणी निश्‍चित केली.