अनिल देशमुख अंडरग्राऊंड; ईडीकडून शोधाशोध सुरू

चौकशीला वारंवार पाठ दाखविणाऱ्या देशमुख यांची 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मालमत्ता जप्तीनंतर 'ईडी'ने देशमुख यांना तिसरे समन्स बजावले मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या विरोधात आधी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते त्या नंतर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

    मुंबई : सक्त वसुली संचलनालयाने तीनवेळा समन्स काढूनही चौकशीला जाणे टाळणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हवाला प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत 4 कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, देशमुख त्यांच्या घरीही नाहीत. त्यामुळेच ते भूमिगत झाले असल्याची चर्चा आहे. या वृत्तानंतर ईडीनेही देशमुख यांची शोधाशोध सुरू केली आहे.

    चौकशीला वारंवार पाठ दाखविणाऱ्या देशमुख यांची 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मालमत्ता जप्तीनंतर ‘ईडी’ने देशमुख यांना तिसरे समन्स बजावले मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या विरोधात आधी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते त्या नंतर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

    अँटिलिया प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या बडतर्फ पोलिस निरिक्षक सचिन वाझेने 4 कोटी रूपये जमा करून देशमुख यांच्या स्वीय सचिव आणि सहायकांना दिल्याचा जबाब दिला होता. त्यानंतर या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने तपास सुरू केला होता. त्यानंतर देशमुख यांच्या मुंबईसह नागपूरातील निवासस्थानावर छापे घालण्यात आले होते. तसेच देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव पालांडे यांनाही अटक करण्यात आली होती.

    दरम्यान, ईडीचे समन्स आले होते, त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असे देशमुख यांनी व्हीडिओ संदेशामार्फत कळविले आहे. माझ्या कुटुंबीयांची अंदाजे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये 2 कोटी 67 लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. पण 2 कोटी 67 लाख रुपयांची जमीन 300 कोटींची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे, असेही ते व्हीडिओत म्हणाले.