दहा बार मालकांकडून अनिल देशमुखांना मिळाले 4 कोटी रुपये; इडीच्या कारवाईत धक्कादायक खुलासा

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरु आहे. दुसरीकडे देशमुख यांच्या मुंबईतील सुखदा या निवासस्थानी ही ईडीची एक टीम सकाळपासून आहे. थोड्याच वेळापुर्वी अनिल देशमुख सुखदा निवासस्थानी दाखल झाले आहे.

    दरम्यान या सगळ्यात अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. पालांडे यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी घेऊन जाण्यात आलं आहे. दुसरीकडे देशमुख यांच्या कुटुंबियांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जात असल्याची माहिती मिळत आहे. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सकाळी साडे सात वाजेपासून देशमुखांच्या ज्ञानेश्वरी आणि सुखदा या निवासस्थानी छापेमारी सुरु आहे.

    अनिल देशमुख दुपारी साडे बाराच्या सुमारास सुखदा बंगल्यावर दाखल झालं आहे. दुसरीकडे देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे यांनाही ईडीने ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली आहे. पालांडे यांच्या चौकशीतून काही बाहेर येतं का, हे पाहणंही महत्वाचं आहे. ईडीने काही लोकांचे जबाबही नोंदवल्याची माहिती मिळतेय. त्यात डीसीपी राजीव भुजबळ आणि काही बार मालकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

    तसेचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.