अनिल देशमुखांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा; रामदास आठवलेंची मागणी

राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे पत्र सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपण देणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

    मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचं राजकारण गल्ली ते दिल्ली पर्यंत ढवळून निघालं आहे. भाजपने आक्रमक पावित्रा घेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आणि आता केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. आणि या संदर्भात अमित शहांची घेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांमुळे परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

    माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या गृह विभागावर कलंक लागला गेला आहे. त्यामुळे नैतिकेच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी आठवले यांनी केली आहे. राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे पत्र सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपण देणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं असलेल्या गाडीच्या प्रकरणात सचिन वाझेंना NIA ने अटक केली आहे. अशा गंभीर प्रकरणात पोलीसांची नावे येत आहेत. आणि आता थेट माजी पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यावरच वसुलीच्या टार्गेटचे गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.