अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, वय आणि कोरोनामुळे चौकशीला येणे शक्य नसल्याचे केले स्पष्ट

ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (२९ जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही.

    मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत ईडीनं त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. परंतु, आजही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी गैरहजार राहणार असल्याचे सांगितले जात आहे. वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.

    अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना माहिती अनिल देशमुख यांनी पत्रात काय माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांनी पत्रात “ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (२९ जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी” अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे. इंद्रपाल सिंह यांनी पुढे सांगितले की , “काही कागदपत्रे घेऊन यायची आहेत. हे ईडीने सांगितले नाही. आता मी ईडी कार्यालयात जाऊन काय कागदपत्रं मागितली आहेत, हे पाहणार आहे.

    काय आहे प्रकरण?

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात (तत्कालीन) गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल, असा दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.