अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे पाठवला; गृहमंत्रीपदाची जबाबदारी आता दिलीप वळसे पाटलांकडे

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

    मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर गृहमंत्रीपद आता पुणे जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. राष्ट्रवादीतील ‘क्‍लीन इमेज’ असलेले आणि शरद पवार यांचे सर्वांत विश्‍वासू, कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. आधीच वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.

    दिलीप वळसे पाटलांचं वैशिष्ट्य ?

    दिलीप वळसे-पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे-पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे-पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाचा राहिल, असे बोलले जात होते.