ईडी नोटीसनंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की…

राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविल्याने महाविकास आघाडीचे दुसरे कॅबिनेट मंत्री ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. ही नोटीस बजावल्या गेल्यानंतर अनिल परब यांनी स्वतः माध्यमांसमोर येत यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्हाला अशी अपेक्षा होतीच, की असं काहीतरी होईल, असं देखील विधान केल्याने, विविध चर्चांना आता सुरूवात झाली आहे.

    मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविल्याने महाविकास आघाडीचे दुसरे कॅबिनेट मंत्री ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. नारायण राणे यांच्या अटकेत अनिल परब यांची मोठी भूमिका होती. त्यामुळे परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याच्या शक्यता आहे.

    दरम्यान, ही नोटीस बजावल्या गेल्यानंतर अनिल परब यांनी स्वतः माध्यमांसमोर येत यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्हाला अशी अपेक्षा होतीच, की असं काहीतरी होईल, असं देखील विधान केल्याने, विविध चर्चांना आता सुरूवात झाली आहे.

    परब नेमकं काय म्हणाले?

    माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, “आज संध्याकाळी मला ईडी ची नोटीस मिळालेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकरणाची उल्लेख नाही. केवळ ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, आमच्या कार्यलायात आपण हजर व्हावं, असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यामध्ये असा कुठलाही विशेष उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कशाच्या संदर्भात आहे. हे आता मला सांगता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत मला ते समजत नाही, की नोटीस कशासंदर्भात आहे. त्यामुळे त्याचं उत्तर देणं कठीण आहे.”

    तसेच, “त्या नोटीसमध्ये सविस्तर काही लिहिलेलं नाही, त्यामळे नोटीस का दिली हे सागंण कठीण आहे. त्यामध्ये केवळ तपासाचा भाग असं म्हटलेलं आहे. बाकी काही म्हटलेलं नाही. त्यामुळे कुठल्या कारणास्तव दिलेली आहे हे सांगता येत नाही. परंतु, साधारण आम्हाला अशी अपेक्षा होतीच, की असं काहीतरी होईल आणि त्याप्रमाणे आता त्याचा कायदेशीर त्याला उत्तर किंवा कायदेशीर सल्ला घेऊन, आम्ही त्याचं उत्तर देऊ. मी आता यावर कुठलाही उल्लेख करणार नाही. मला ते सगळं कारण कळलं पाहिजे. जी कारणं कळतील, त्यावेळी त्याचं कायदेशीर उत्तर काय असेल ते मी देईन. या सर्व घडामोडींवर मी कायदेशीर अभ्यास करून त्याबाबतचा निर्णय घेईल. कायदेशीर नोटीस आली आहे, त्याला कायदेशीररित्या उत्तर दिलं जाईल.” असं परब यांनी स्पष्ट केलं.