परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप ; पोलीस प्रमुखांना पत्र लिहून प्राथमिक गुन्हा नोंदवून चौकशीची मागणी

सध्या अकोला पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत असलेले पोलीस निरिक्षक बी आर घाडगे यांनी राज्याच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून २० एप्रिल रोजी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देखील पाठविण्यात आली आहे.

    किशोर आपटे, मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित लाचखोरी आणि खंडणीचे आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत अशी माहिती गृहविभागाच्या जाणकार सूत्रांनी दिली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस प्रमुख संजय पांडे यांना पत्र लिहून प्राथमिक गुन्हा नोंदवून चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एका लाचखोरीच्या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता असल्याची माहिती गृहविभागाच्या जाणकार सूत्रांनी दिली आहे.

    पोलीस निरिक्षक बी आर घाडगे यांचे पत्र

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या अकोला पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत असलेले पोलीस निरिक्षक बी आर घाडगे यांनी राज्याच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून २० एप्रिल रोजी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देखील पाठविण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या या पत्रात म्हटले आहे की, आपल्याला सिंग यांच्या विरोधात प्राथमिक गुन्हा नोंदवण्याची परवानगी देऊन न्याय द्यावा. सध्या राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख असलेल्या परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि लाचखोरी बाबतची पोलीस अधिकाऱ्यांची ही दुसरी तक्रार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

    अशा प्रकारची दुसरी तक्रार

    या पूर्वी मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांनी अशा प्रकारे सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सूत्रांनी सांगितले की १४ पानांच्या आपल्या तक्रार पत्रात घाडगे यांनी म्हटले आहे की सिंग ठाण्यात पोलीस आयुक्त होते त्यावेळी सन २०१५-२०१८ दरम्यान त्यांनी अनेक प्रकारचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यावेळी ते स्वत: ठाणे येथे बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या पत्रात घाडगे यांनी या भ्रष्टाचारची सविस्तर माहिती दिली असून चौकशीला बोलावण्यात आले तर या संबंधीचे पुरावे देखील आपण सादर करू शकतो असे तक्रार अर्जात नमूद केले आहे.