पालिकेकडून रस्ते दुरुस्तीसाठी आणखी १ हजार कोटींच्या निविदा

मुंबईतील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी पालिकेकडून इच्छुक कंपन्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. या कामात पालिका हद्दीतील ७०० कोटी रु. कामांसह म्हाडा वसाहतीतील रस्ते कामांसाठी ३०० कोटी रु. खर्च केले जाणार आहे. पालिकेने यापूर्वी गेल्या आठवड्यात रस्ते कामांसाठी १,१०० कोटी रु. च्या निविदा काढल्या होत्या.

    मुंबई – मुंबईतील खड्ड्यांची समस्या तीव्र होत असतानाच त्यावरुन सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष चिघळत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणखी तब्बल १,००० कोटी रु.च्या निविदा मागविण्याचे ठरविले आहे. त्यातून मुंबईतील सिमेंट काँक्रीट आणि डांबरी रस्ते अधिक चांगले होण्याचा दावा केला जात आहे.

    मुंबईतील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी पालिकेकडून इच्छुक कंपन्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. या कामात पालिका हद्दीतील ७०० कोटी रु. कामांसह म्हाडा वसाहतीतील रस्ते कामांसाठी ३०० कोटी रु. खर्च केले जाणार आहे. पालिकेने यापूर्वी गेल्या आठवड्यात रस्ते कामांसाठी १,१०० कोटी रु. च्या निविदा काढल्या होत्या.

    पालिकेने नव्याने मागविलेल्या निविदांमध्ये शहर भागांमध्ये परळ, वरळी, लोअर परळ, दादर, मुंबई सेंट्रलचा समावेश आहे. त्यास उपनगरात दहिसर, बोरिवली, अंधेरी, कुर्ला विभागाचा समावेश आहे.

    यापूर्वी पालिकेने मागविलेल्या १,२०० कोटी रु.च्या रस्ते निविदांमध्ये कंत्राटदारांनी पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा ३० टक्के कमी खर्चाने कामे करण्याची तयारी दाखवली होती.त्यावर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर पालिकेने निविदा रद्द केल्या होत्या. त्यानंतर पालिकेने फेरनिविदा मागविण्याचे जाहीर केले.

    अशा प्रकारे, पालिकेने पहिल्या टप्प्यात १,१०० कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या होत्या.त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात रस्ते दुरुस्तीसाठी १ हजार कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत.