नितेश राणेंचा शिवसेनेवर आणखी एक गंभीर आरोप

कर्मचारी स्वत: विमा काढतील, पण त्यांच्या भावनांशी आणि स्वतःच्या अर्थकारणासाठी खेळू नये. आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वत:च्याच कौतुकाचे पोवाडे गातात. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’चीही जगभर वाहवा ‘मिळवून’ घेतली जाते. अशा कामाचे श्रेय घेता, मग बंद पडलेल्या योजनांचे काय? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

    मुंबई : कोविड योद्धे असलेले महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. मात्र अशा कर्मचाऱ्यांसाठी आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना बंद पाडण्यात आली आहे, हे आपणास माहित नाही का? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. त्यामुळे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

    मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी आणि १ एप्रिल २०११ सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. १ ऑगस्ट २०१५ साली ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीही करण्यात आली होती.

    सुरुवातीला २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात ही योजना बंद करण्यात आली असून ती अद्याप सुरु झालेली नाही. आपल्या हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे, असे आमदार राणे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

    सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्याच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी.