मगदुम शहाबाबा दर्गा ट्रस्टतर्फे कौतुक; पोलीस नाईक रेहाना शेख यांचा सन्मान

मुंबई पोलीस दलातील पोलीस कायम सतर्क असतात हे वारंवार समोर आले आहे. याहून कौतुकास्पद बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी कायम कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी जपली आहे. या पोलिसांमध्ये पोलीस नाईक रेहाना शेख-बागवान यांचे नाव आवर्जून घेण्यासारखे आहे.

  मुंबई – पोलीस नाईक रेहाना शेख-बागवान यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना मगदुम शहाबाबा दर्ग्योचे ट्रस्टी सुहैल किडवाणी यांनीही त्यांचा सोमवारी सायंकाळी सन्मान केला. या दर्ग्यातर्फे आजवर अनेकांचा सन्मान करण्यात आला आहे; मात्र मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदार म्हणून पहिला मान रेहाना शेख-बागवान यांच्या वाट्याला आला आहे.

  मुंबई पोलीस दलातील पोलीस कायम सतर्क असतात हे वारंवार समोर आले आहे. याहून कौतुकास्पद बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी कायम कर्तव्यापलीकडे जाऊन माणुसकी जपली आहे. या पोलिसांमध्ये पोलीस नाईक रेहाना शेख-बागवान यांचे नाव आवर्जून घेण्यासारखे आहे.

  त्यांनी ज्ञानाई विद्यालयात (मु. पो. धामणी, ता. वाझे, जि. रायगड) शिकणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले. ‘आजचे विद्यार्थी हे उद्याच्या उज्ज्वल भारताचे भवितव्य आहे,’ याची पुरेपूर जाण असल्याने रेहाना शेख यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले.

  दरम्यानच्या काळात देशात कोरोनाचे संकट आले. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला. परिणामी बेड, आॅक्सिजनची कमतरता भासू लागली. असे असताना कोरोनाबािधतांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेअरपी संजीवनी ठरली. हे लक्षात घेऊन रेहाना शेख यांनी कोरोनाबाधितांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

  ५४ जणांना प्लाझ्मासाठी मदत

  शिवशंभू ट्रस्टचे अप्पा घोरपडे, छावा संघटनेचे ठाणे जिल्हाप्रमुख अक्षय भोईर, विश्वास दाते, ऋषी साबळे, विश्वास दाते, अ‍ॅड. हजारे, अक्षय दसके, संदीप रासकर, लोकेश कांबळी, अर्पण बल्ड बँकचे (मुलुंड) जैन, माने, पोलीस नाईक सुनील देसाई, पोलीस नाईक घाडी यांच्या मदतीने ५४ जणांना प्लाझ्मा मिळवून दिला.

  या ५४ कोरोनाबाधितांमध्ये ३२ पोलीस अधिकारी, अंमलदार, कुटुंबिय, २२ सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. तसेच कोरोनाची बाधा झालेल्या हजारोंसाठी बल्ड, रुग्णालवाहिका, बेड, इतर वैद्यकीय मदत करून पोलीस नाईक रेहाना शेख-बागवान यांनी मुंबई पोलीस खात्याच्या इतिहासात कर्तव्याची उल्लेखनीय नोंद केली.

  २९३ विद्यार्थ्यांची शैक्षणिक जाबबदारी स्वीकारली

  रेहाना शेख-बागवान यांच्या कामाची दखल घेऊन मगदुम शहाबाबा दर्ग्याचे ट्रस्टी सुहैल किडवाणी यांनी ‘मगदुम शहाबाबांच्या दर्गा’ची प्रतिमा व शाल देऊन त्यांना सन्मानित केले. तसेच रेहाना शेख यांनी शैक्षणिक दत्तक घेतलेल्या ज्ञानाई विद्यालयातील २९३ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च व शाळेला अन्य मदत करण्याचे ट्रस्टी सुहैल किडवाणी यांनी जाहीर केले.