पालिकेतील १३२ अभियंत्यांच्या पदोन्नतीला पालिका सभागृहाची मंजूरी

सेवाज्येष्ठता डावलून काही अभियंत्यांना पदोन्नती नाकारली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. विरोधी पक्षाने ही बाब लावून धरली होती. त्यामुळे या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. यापूर्वी अभियंत्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यावर त्यावर तात्काळ निर्णय घेतला जात होता. मात्र पहिल्यांदाच हा प्रस्ताव महिनाभर प्रलंबित राहिला होता. दरम्यान या निर्णयाचे अभियंता संघटनांनी स्वागत केले आहे.

    मुंबई – मुंबई महापालिकेतील १३२ अभियंत्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न अखेर सुटला आहे. पदोन्नतीच्या प्रस्तावाला पालिका सभागृहात मंजुरी दिली आहे. पदोन्नतीचा प्रस्ताव गेल्या एक महिन्यापासून मंजुरीसाठी प्रलंबित होता.पालिकेच्या १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता तर २६ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मागील महिनाभरापासून मंजुरीविना प्रलंबित होता. शुक्रवारी झालेल्या पालिका सभागृहात याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

    सेवाज्येष्ठता डावलून काही अभियंत्यांना पदोन्नती नाकारली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. विरोधी पक्षाने ही बाब लावून धरली होती. त्यामुळे या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. यापूर्वी अभियंत्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यावर त्यावर तात्काळ निर्णय घेतला जात होता. मात्र पहिल्यांदाच हा प्रस्ताव महिनाभर प्रलंबित राहिला होता. दरम्यान या निर्णयाचे अभियंता संघटनांनी स्वागत केले आहे.

    पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेले अभियंते हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. यातील काही अभियंते वर्षभरात तर काही पुढील दोन ते तीन वर्षात निवृत्त होत आहेत. त्यांचा प्रस्ताव रखडला असता अनेकांना पदोन्नती न मिळताच निवृत्त व्हावे लागले असते. परिणामी या पदाच्या निवृत्तीनंतरच्या लाभांना मुकावे लागले असते, असे संघटनेकडून सांगण्यात आले. या निर्णयाबाबत बृहन्मुंबई महापालिका इंजिनिअर युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष व म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुखदेव काशिद यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.