तुम्ही जल्लाद आहात का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सचिन वाझेंचे वकिल म्हणाऱ्यांवर शिवसेनेचा जबरदस्त पलटवार

  मुंबई: मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षाने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सचिन वाझे यांचे वकील आहेत, असा आरोपही विरोधकांनी केला. त्यांच्या या आरोपाला शिवसेनेचे मंत्री अॅड. अनिल परब यांनी जबरदस्त पलटवार केला आहे.

  मुख्यमंत्र्यांना सचिन वाझे यांचे वकील आहेत म्हणत असाल तर विरोधी पक्ष जल्लाद आहे का?, असा खरमरीत सवालच अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता उपस्थित केला आहे.

  विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, विरोधकांची मागणी फेटाळण्यात आली असून वाझे यांची तूर्त बदली करण्यात आली आहे.

  आधी फाशी आणि नंतर चौकशी हे आम्हाला मान्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावून सांगितले. दरम्यान, यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. सचिन वाझे यांना आता वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत, असे फडणवीस म्हणाले. त्याला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.

  मुख्यमंत्र्यांना सचिन वाझे यांचे वकील म्हणत असाल तर चौकशीआधी एखाद्याला शिक्षा द्यायला सांगणारा विरोधी पक्ष जल्लादाची भूमिका निभावत आहे आहे का?, असा सवाल परब यांनी केला. सचिन वाझे यांच्यापेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत. त्यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विरोधकांना जल्लादाच्या भूमिकेत पाहून आम्हाला फार वाईट वाटले, असा टीकेचा बाणही परब यांनी सोडला.

  ]