अरमान कोहलीच्या ‘एनसीबी’ कोठडीत बुधवारपर्यंत वाढ; ‘एनडीपीएस’च्या विशेष न्यायालयाचा निर्णय

अरमान कोहलीला एनसीबीने अटक केली होती. ड्रग्सची तस्करी करणारा अजय राजू सिंहलाही अटक करण्यात आली. दोघांवरही मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    मुंबई (Mumbai) :  बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) अरमान कोहलीच्या (Arman Kohli) कोठडीत सोमवारी मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने (special NDPS court) १ सप्टेंबरपर्यत वाढ केली. त्यासोबत अटक करण्यात आलेला कथित ड्रग तस्कर (drug smuggler) अजय सिंहच्या (Ajay Singh) कोठडीतही न्यायालयाने बुधवारपर्यंत वाढ केली आहे.

    शनिवारी संध्याकाळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी)ने अरमान कोहलीच्या मुंबईतील हाजी अली येथील घरावर छापा टाकून काही प्रमाणात ड्रग्स हस्तगत केला होता. त्यानंतर चौकशीअंती अरमान कोहलीला एनसीबीने अटक केली होती. ड्रग्सची तस्करी करणारा अजय राजू सिंहलाही अटक करण्यात आली.

    दोघांवरही मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना विशेष एनडीपीएस न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर एक दिवसासाठी एनसीबी कोठडीत पाठवले होते.

    त्यानंतर सोमवारी पुन्हा त्यांच्या कोठडीची मागणी एनसीबीच्यावतीने करण्यात आली. छापेमारीदरम्यान अभिनेत्या घरातून एक ग्रॅंमपेक्षा जास्त कोकेन जप्त करण्यात आला असून अधिक चौकशीसाठी दोघांचीही कोठडी आवश्यक असल्याचेही एनसीबीच्यावतीने सांगण्यात आले. त्याची दखल घेत न्यायायाने दोघाच्याही कोठडीत १ सप्टेंबरपर्यत वाढ केली.