सात वर्षात ३७० कलम रद्द झाले आणि राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला तरीही, मोदींनी विश्वास गमावला – खा.अरविंद सावंतांची टीका  

केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभावाने वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे पळवले जात आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मोदी गुजरातला गेले. विमान थोडे पुढे सरकवले असते तर कोकणची किनारपट्टी दिसली असती. हजार कोटी गुजरातला देणारे मोदी महाराष्ट्रबद्दल एक शब्दही बोलत नाहीत- सावंत

    मुंबई: सात वर्षात गेल्या ७० वर्षाच्या तुलनेत काहीच चांगले झाले नाही, असे आम्ही म्हणणार नाही. ७० वर्षातही चांगली कामेच झाली असेच आम्ही म्हणू. कदाचित आम्ही दोन पाऊल पुढे जावून सात वर्षात ३७० कलम रद्द झाले आणि राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला हे दोन निर्णय चांगले झाले, अश्या शब्दात मोदी सरकारची प्रशंसा शिवसेना खासदार अरविंद सावंत यानी केली आहे.

    शिवसेनेची भूमिका जगजाहीर
    खा सावंत म्हणाले की, राम मंदिर आणि ३७० कलमाबाबत शिवसेनेची भूमिका जगजाहीर आहे. आम्ही ती वेळोवेळी मांडली आहे. शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका सातत्याने रेटली आहे. त्यामुळे या दोन गोष्टी सात वर्षात चांगल्या झाल्या. पण नोटाबंदी, जीएसटी, कामगार कायदा आणि कृषी कायदा हे चार निर्णय अतिशय वाईट होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली आहे. कोरोनामुळे ती शिगेला पोहचली आहे, असे त्यांनी सांगितले.

    मोदींनी आमचा विश्वास गमावला आहे
    केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभावाने वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे पळवले जात आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मोदी गुजरातला गेले. विमान थोडे पुढे सरकवले असते तर कोकणची किनारपट्टी दिसली असती. हजार कोटी गुजरातला देणारे मोदी महाराष्ट्रबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. मोदींनी आमचा विश्वास गमावला आहे, अशी टीका त्यांनी केली.