वाढत्या रुग्णसंख्येनुसार खाटांबाबत पालिकेकडून नियमावली जाहीर; गतवर्षीच्या तुलनेत खाटांमध्ये वाढ

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शहरातील राज्य सरकार, पालिका आणि खासगी रुग्णालयातील कोविड खाटांमध्ये वाढ करण्याबाबत सरकारकडून कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार सध्याच्या घडीला गतवर्षीच्या जुलैमध्ये असलेल्या खाटांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये जुलै २०२० मध्ये एकूण ५०३ खाटा होत्या त्यात वाढ होऊन ९६७ इतक्या खाटा झाल्या आहेत.

  मुंबई: मुंबईमध्ये सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णालये, नर्सिंग होम हे पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमला कोणतीही सूचना न देता कोविड रुग्ण दाखल करून घेत आहेत. परिणामी रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यामध्ये वॉर्ड वॉर रूमला अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांना सहज खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी कोविड रुग्णांसाठी उपलब्ध खाटांसदर्भात नियमावली जाहीर केली. त्यानुसार शहरामधील राज्य सरकार, पालिका व खासगी रुग्णालय, कोविड सेंटरमधील प्रमुखांना रुग्ण दाखल करताना वॉर्ड वॉर रूमशी समन्वय ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  गेल्यावर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर कोरोना रुग्णांना शहरामध्ये खाटा मिळणे तसेच इतर मदत मिळणे अवघड झाले होते. रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने शहरातील सर्व सरकारी, पालिका, खासगी रुग्णालये व नर्सिंग होममधील खाटा सहज उपलब्ध करून देण्यासाठी वॉर्ड वॉर रूम सुरू केले होते. या वॉर रूमला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर रुग्णांना रुग्णालयामध्ये सहज खाटा उपलब्ध होत असल्याने वॉर्ड वॉर रूमचे महत्त्व कमी झाले होते. आता पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने रुग्णांना सहज खाटा मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिकेने वॉर्ड वॉर रूमसंदर्भातील नियमावली तातडीने जारी केली आहे.

  पालिका आरोग्य विभागाची नवी नियमावली
  या नियमावलीनुसार रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार शहरातील सर्व खाटा ताब्यात घेण्यात येणार आहेत. प्रत्येक वॉर्डचा सहायक आयुक्त नर्सिंग होम, रुग्णालयांमधील कोविड खाटांसदर्भात निर्णय घेतील, सहायक संचालकांना गरज वाटल्यास नर्सिंग होम, खासगी रुग्णालयांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. त्याचप्रमाणे रुग्णालयातील खाटांचे नियोजन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्थानिक नर्सिंग होम आणि रुग्णालयातील खाटा आणि आयसीयू विभागातील खाटा प्रथम उपयोगात आणण्यात याव्यात. त्यानंतर कामगार रुग्णालयातील खाटा, खासगी रुग्णालयातील नियमित आणि आयसीयू खाटा, त्यानंतर विविध जम्बो कोविड सेंटरमधील खाटा उपयोगात आणण्यात याव्यात. त्यानंतर शहरातील विविध सरकारी रुग्णालयातील व सरते शेवटी महापालिका रुग्णालयातील खाटा कोविड रुग्णांसाठी वापरण्यात याव्यात अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

  वाॅर्ड वाॅर रुमला माहिती देणे बंधनकारक!
  वॉर्ड वॉर रूमला कळवल्याशिवाय कोणताही कोविड रुग्ण दाखल करण्यात येऊ नये. कोविड रुग्णाला खाटांची गरज असल्यास लक्षणे नसलेल्या तसेच अन्य आजार नसलेल्या कोणत्याही रुग्णाला कोविड रुग्णालयात खाट उपलब्ध करून देण्यात येऊ नये. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आणि आयसीयूमधील १०० टक्के खाटा या वॉर्ड वॉर रूममार्फत दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. या खाटांवर खासगी रुग्णालयांकडून कोणताही रुग्ण दाखल करण्यात येऊ नये. सर्व रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर्स, औषधे, पीपीई किट, मास्क, व्हीटीएम किट हे पुरेसे असल्याची खात्री करून घेणे, तसेच त्याचा पुरवठा व्यवस्थित होण्याकडे लक्ष देणे. कोविड रुग्णांना पुरवण्यात येणार्‍या सुविधांबाबत कोणत्याही रुग्णालयाने नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

  गतवर्षीच्या तुलनेत खाटांमध्ये वाढ
  गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शहरातील राज्य सरकार, पालिका आणि खासगी रुग्णालयातील कोविड खाटांमध्ये वाढ करण्याबाबत सरकारकडून कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार सध्याच्या घडीला गतवर्षीच्या जुलैमध्ये असलेल्या खाटांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये जुलै २०२० मध्ये एकूण ५०३ खाटा होत्या त्यात वाढ होऊन ९६७ इतक्या खाटा झाल्या आहेत. खासगी रुग्णालयामध्ये २८०९ इतक्या खाटा होत्या त्या आता ३२१८ इतक्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १० हजार ९३४ खाटा होत्या. सध्या ९३९७ खाटा आहेत. पालिकेच्या इएनटी व नेत्र रुग्णालयात २०२० मध्ये सुरू केलेल्या खाटा परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बंद केल्याने खाटांची संख्या कमी झाली आहे.