आषाढी वारीचा कार्यक्रम ठरला; भाविकांसाठी मंदिर बंद

विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

  पंढरपूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरला जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी वारी 2021 च्या नियोजनाला सोमवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिला. त्याबाबतचा आदेशही काढला आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

  भाविकांसाठी मंदिर बंद

  दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असे सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच पंढरपुरात प्रवेश

  पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी ज्या वारकऱ्यांनी दोन लसीचे डोस घेतले असतील अशा वारकऱ्यांनाच पंढरपुरमध्ये प्रवेश देण्याबाबत मागणी केली आहे. तर या वारकऱ्यांच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासूनच पंढरपुरात प्रवेश दिला जाईल असेही भोसले यांनी म्हटले आहे.

  हे सुद्धा वाचा