“चेहरा भोळा अन् भानगडी सोळा” म्हणत आशिष शेलारांचे आरेमध्ये मेट्रो कारशेडवरून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय!

    मुंबई: आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास प्रचंड विरोध झाल्याने महाविकास आघाडी सरकारने कारशेड आरेतून कांजूरमार्ग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजपचे व महाविकास आघाडीमध्ये चांगले राजकारण रंगले आहे. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “चेहरा भोळा अन् भानगडी सोळा” असं म्हणत कांजूरमार्ग कारशेडवरून शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

    आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. “श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे” असं म्हणत निशाणा साधला आहे. “मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने ३ हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?” असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    “कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरू आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!” अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच “मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार? गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला. वाढलेला १० हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला. श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे!” असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.