ईडीने जप्त केलेल्या इमारती क्वारंटाईन सेंटरसाठी घ्या – आशिष शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: वांद्रे पूर्व येथील नॅशनल हेरॉल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या सुमारे २ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या ईडीने जप्त केलेल्या इमारतीसह मुंबईत ईडीने अशा जप्त केलेल्या इमारती कोरोना रुग्णांना क्वारंटाईन

मुंबई: वांद्रे पूर्व येथील नॅशनल हेरॉल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या सुमारे २ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या ईडीने जप्त केलेल्या इमारतीसह मुंबईत ईडीने अशा जप्त केलेल्या इमारती कोरोना रुग्णांना क्वारंटाईन सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री, आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्राव्दारे आज केली आहे.

 आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कलानगर जवळील वांद्रे पूर्व भाग, गांधी नगर, एमआयजी क्लब आसपासचा परिसर, वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. एच-ईस्ट प्रभागात आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.त्यातील बरेचजण झोपडपट्टीत किंवा चाळींंमध्ये रहात आहेत, जेथे घरातच त्या़ना अलग ठेवणे शक्य नाही. त्यामुळे या परिसरात रहिवाशांना निवासस्थानाजवळ विलगीकरण कक्ष उपलब्ध करुन देणे आव्हानात्मक काम आहे. अंमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेरॉल्ड प्रायव्हेट लिमिटेडची ताब्यात घेतलेली ही इमारत सुमारे २ लाख चौरस फूटपेक्षा जास्त चटईक्षेत्र असलेली आहे. इमारतीच्या बाह्य कामासह सर्व बांधकाम जवळजवळ पूर्ण झालेले आहे. शिवाय ती इमारत कोरोनाव्हायरस हॉटस्पॉट्सजवळ व वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गाच्या ही जवळ आहे. त्यामुळे या इमारतीत सुमारे १ हजार खाटांची सुविधा करणे शक्य आहे.

कोरोना व्हायरसचे मुंबईतील वाढते रुग्ण तसेच आता परदेशातून व परराज्यातील नागरिकांना येण्याची देण्यात आलेली परवानगी तसेच तोंडावर असलेला पावसाळा या सर्व पार्श्वभूमीवर विलगीकरण कक्षासाठी जास्तीत जास्त जागा शासन उपलब्ध करुन देत आहे. नुकतीच आपण केंद्र शासनाच्या काही जागांची मागणी ही विलगीकरण कक्षांसाठी केल्याचे आपण जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्य शासनाला जागेची निकड पाहता महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी संचालनालय आणि वित्त मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करुन अशा  जप्त केलेल्या वास्तूंची मागणी कोरोनाव्हायरस रूग्णांसाठी स्वतंत्र आणि बेड सुविधा उपलब्ध करण्यासाठी करावी,  असे  आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.