कामात अपयशी ठरले म्हणून मुंबईत आयुक्त बदललेत तर मग ठाण्यात पालकमंत्री बदलणार का?  – आशिष शेलार

मुंबई: ठाण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण रोखण्यात अपयश आले आहे. ठाण्यातले २ वजनदार मंत्री मंत्रिमंडळात आहेत, तरीही रुग्णसेवेची दैना उडाली असून पालक मंत्री या कामात अपयशी ठरले आहेत. त्यांच्याच

मुंबई:  ठाण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण रोखण्यात अपयश आले आहे. ठाण्यातले २ वजनदार मंत्री मंत्रिमंडळात आहेत, तरीही रुग्णसेवेची दैना उडाली असून पालक मंत्री या कामात अपयशी ठरले आहेत. त्यांच्याच मतदारसंघात रुग्ण संख्या जास्त, मृत्यूदर जास्त, असे चित्र आहे. केंद्रीय पथक आणि राज्याचे मुख्य सचिव यांना ठाण्यात यावे लागले, असे दुर्दैवी चित्र ठाण्यात आहे. पालिका आयुक्तांसह दोन आयएएस अधिकारी एक मंत्र्यांचे ओसडी एवढे अधिकारी बसवले तरी कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही. इतकी वर्षे ठाण्यात शिवसेनेची महापालिकेत सत्ता आहे. चांगली हॉस्पिटल उभारले नाही. अॅम्ब्युलन्स नाही, भाड्याने अॅम्ब्युलन्स घ्यावी लागली, असे दुर्दैवी चित्र ठाण्यात आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने मुंबईत कोरूना रोखण्यात अपयश आल्यानंतर पालिका आयुक्त बदलले ठाण्यात आयुक्त नवीन आहेत मग आता ठाण्यातील पालकमंत्री बदलणार का ? असा प्रश्न आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

झोपडपट्टी पुनर्विकास योजनांमध्ये पाच हजार चौरस फुटाचे प्राथमिक आरोग्य केंद्र फ्री ऑफ एस आय देणार अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री करतात मात्र असे केंद्र द्यायचे असेल तर त्यासाठी नियम बदलण्याचा अधिकार गृहनिर्माण मंत्र्यांना नाही तो अधिकार नगर विकास खात्याच्या मंत्र्यांना आहे. नगर विकास मंत्री हे ठाण्याचेच असून त्यांनी मुंबई सोडून ठाणे पुणे सह राज्यातील अन्य शहरांसाठी युनीफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रुल (युडीसीआर ) जो तयार केला गेला आहे, त्यामध्ये प्रस्तावित अंतिम बदल असा करायचा ठरवला आहे की, १५% सुविधांच्या जागा नागरिकांच्या सुविधांसाठी पुर्वीच्या नियमानुसार मिळणार होत्या. त्या १५% ऐवजी नविन प्रस्तावीत यु डिसीआरमध्ये ५% केल्या आहेत. याचा अर्थ सुविधा केंद्राच्या १०% टक्के जागा खाऊन टाकण्याचे काम नगरविकास मंत्री करीत आहेत. तर दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागा वाढवून असे म्हणतात याचा अर्थ कोरोनाच्या महामारीमध्ये विकासकांची ‘वाटेमारी’ठाण्यातील दोन मंत्री करीत आहेत. त्यामुळे भूलथापा मारु नये. आरोग्य केंद्र देण्यास आमचा विरोध नाही पण नागरिकांच्या मोकळ्या जागा हडप करण्यात येत आहे. भूलथापा मारल्या जात आहेत. मोकळ्या जागा ज्या नागरिकांच्या सुविधांसाठी असतात त्या जमिनीवर कमी करण्याचे पाप महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार करते आहे. अशा मोकळ्या जागा होत्या म्हणून आज काही ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर आज उभी आपण करु शकलो. पण या मोकळ्या जागा गिळंकृत करण्याचे पाप हे सरकार नव्या युडिसीआरमध्ये करीत आहे. 

शाळेची फी वाढ करु नये उलट पक्षी यावेळी शाळांनी दहा टक्के फी कमी करावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली. एका राजकीय पक्षाची युवा संघटना सरकारला बेकायदेशीर निर्णय घेण्यास भाग पाडते आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन १२ प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे द्या, मग निर्णयावर बोलू. पण सरकारने त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीच शिवाय मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ ही दिली नाही. म्हणून आम्ही राज्यपालांना भेटलो. एटीकेटी असलेल्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थीना नापास करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एका पिढीचे नुकसान केले जाते आहे. दुर्दैवाने एका पक्षाची युवा संघटनेने सत्ताबाह्य केंद्र सुरु केले आहे. अंतिम वर्षे परिक्षा रद्द झाल्याचे त्यांनी जाहीर केले तसेच परस्पर शाळा सुरु व्हायच्या तारखा ही त्यांनीच जाहीर केल्या. हे सत्ता बाहेरील केंद्र एका पक्षाची युवा संघटना निर्माण करते आहे ते राज्यासाठी घातक आहे. केवळ आपले नेतृत्व युवकांमध्ये निर्माण होण्यासाठी हे सत्ताबाह्य केंद्र सुरु केले जात आहे. आम्ही सरकारला सुचना दिल्या, निवेदने दिली. जनतेचे प्रश्न मांडले की आम्हाला द्रोही ठरवले जाते आम्हाला राजकारण करु नका अशा सूचना केल्या जातात पण आपल्या पक्षाच्या मुखपत्रातून मात्र रोज केंद्र सरकारवर टीका केली जाते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपा ठाणे शहर अध्यक्ष आमदार अॅड निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिका गट नेते संजय वाघुलै आदी उपस्थित होते.