महाराष्ट्रातील कारभार म्हणजे तालिबानी आशिष शेलारांची टिका

आज दहिहंडी उत्सव पारंपरिक पध्दतीने आणि गर्दी न करता साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार राम कदम यांच्यासह उत्सव साजरा करणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला. डोंगरी येथे माझ्या उपस्थितीत जो पारंपरिक उत्सव साजरा होणार होता, त्यावर काल रात्रीपासून पोलिसांनी बंदी आणून आयोजकांवर दडपशाहीचा वापर करण्यात आला.

    मुंबई : दहिहंडी पारंपरिक पद्धतीने सुध्दा साजरी करणाऱ्यांवर गुन्हे आणि दडपशाहीचा कारभार करणाऱ्या ठाकरे सरकारचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरु आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

    आज दहिहंडी उत्सव पारंपरिक पध्दतीने आणि गर्दी न करता साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार राम कदम यांच्यासह उत्सव साजरा करणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला. डोंगरी येथे माझ्या उपस्थितीत जो पारंपरिक उत्सव साजरा होणार होता, त्यावर काल रात्रीपासून पोलिसांनी बंदी आणून आयोजकांवर दडपशाहीचा वापर करण्यात आला. कुलाब्यात कोकण विकास आघाडीचे पदाधिकारी कमलाकर दळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

    आज मुंबईत ठिकठिकाणी हेच चित्र दिसत होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांना अशाच पध्दतीने दडपशाहीचा अनुभव आज आला. आम्ही ठाकरे सरकारच्या या कारभाराचा निषेध करतो. गणेशोत्सव काळात पण असाच पोलीस बळाचा वापर केलात तर आज आम्ही शांततेने कायद्याचा सन्मान केला, पण गणेशोत्सवात अशी दडपशाही सहन करणार नाही. नियम पाळून शांतपणे गणेशोत्सव साजरा करु द्या. अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

    दरम्यान, गर्दीची कारणे सांगून उत्सवावर बंदी आणत आहात मग, पब, डिस्को, बार कसे सुरु आहेत? जे “वाटाघाटी” करतात त्यांना परवानगी आणि उत्सवांंवर कायद्याने बंदी? हा कसला कारभार? असा टोलाही आमदार आशिष शेलार यांनी प्रसिद्धपत्रात लगावला आहे.