राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा “वाटाघाटीचा” नवा धंदा! – शेलार

गेल्या दिड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा कोरोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? असा सवाल आमदार आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे

    मुंबई – ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात. म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले “वाटघाटी” झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत, वाटाघाटी करु शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली.

    राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करु असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करा, अन्यथा आम्ही नाव जाहीर करु, असा गर्भित इशारा ही यावेळी आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

    आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की,
    काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बळाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काय महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या, जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. म्हणून मा. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आठवण करून देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय? म्हणून आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय? ज्या पद्धतीने बळाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय.

    गेल्या दिड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा कोरोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय?
    आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का?
    आणि म्हणून केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला सांगितलं होतं टेस्ट वाढवा, वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेचे आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका.