Ashok Chavan responds to allegations made by Opposition on maratha reservation

सरकार कुणाचे आहे हे महत्त्वाचे नाही. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कंबर कसली पाहिजे. आजच्या परिस्थितीत काय केले पाहिजे याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे, असे सांगतानाच काही लोक मात्र गोबेल्स नीती वापरून मराठा आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला.

मुंबई : मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ आहे. या कायद्याला कोणताही अडथळा येणार नाही, असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. हा कायदा इतका फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र  फडणवीस यांना केला. मंगळवारी विधानसभेत पुरवणी मागण्यांवर सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा सवाल केला.

फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी फुलप्रुफ कायदा आणू म्हणून सांगितले होते. या कायद्यामुळे काहीच अडचण येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. तुमचा कायदा एवढाच फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात तो टिकला का नाही? असा सवाल करतानाच आम्ही तर तुम्ही आणलेला आरक्षण कायदा मान्य केला, त्यावर चर्चाही केली नाही आणि आक्षेपही घेतला नव्हता, असे चव्हाण म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेलेच वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. एकूण नऊ ते दहा निष्णांत वकील हा खटला लढवत आहेत. पण काही ना काही मुद्यांवर विषय अडत आहे. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आता या प्रकरणावर कोर्टात दररोज सुनावणी होणार असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकार कुणाचे आहे हे महत्त्वाचे नाही. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कंबर कसली पाहिजे. आजच्या परिस्थितीत काय केले पाहिजे याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे, असे सांगतानाच काही लोक मात्र गोबेल्स नीती वापरून मराठा आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओबीसींचे आरक्षण कायम राहणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाबाबत काही वेगळा विचार नाही. या आरक्षणात काही फरक पडणार नाही. पण काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानपरिषदेच्या निकालानंतर विशेषत: मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.