काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा हरपला, एकनाथ गायकवाड यांना अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. गायकवाड यांचं आज (बुधवारी) सकाळी कोरोनामुळे मुंबईत निधन झालं.

    ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. गायकवाड यांचं आज (बुधवारी) सकाळी कोरोनामुळे मुंबईत निधन झालं.

    गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, आयुष्यभर त्यांनी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तेवत ठेवला. राजकारणात अनेक चढ-उतार सोसले. पण कधीही आपल्या तत्वांचा त्याग केला नाही. युवक काँग्रेसपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आमदार, मंत्री, खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी बहरत गेली. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण आपली साधी राहणी व कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी कधी सोडला नाही. ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे व कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. त्यामुळेच प्रदीर्घ काळ आमदार व खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती.

    एकनाथ गायकवाड यांच्यावर काळाने कोरोनाच्या रूपात घातलेला घाला काँग्रेस पक्ष आणि समाजासाठी मोठी हानी आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व आमच्या सहकारी प्रा. वर्षाताई गायकवाड तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना करतो, या शब्दात अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिलीय.