शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत मोर मचाये शोर… पवारांनी बोटांनीच इशारा केला

    मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मात्र, या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा मोरांचाच आवाज जास्त होता. मोरांचा आवाज जोरजोरात येत होता. त्यावेळी शरद पवारांनाही हसू आवरलं नाही, त्यांनी बोटाने इशारा करत, मोरांच्या आवाजाकडे उपस्थितांचं लक्ष वेधलं.

    केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पी सी चाको यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल पटेल उपस्थित होते. पी सी चाको हे काँग्रेसकडून तब्बल सातवेळा खासदार होते.

    चाको यांच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद सुरु केली. त्यांनी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच मोरांचे आवाज लक्ष वेधून घेत होते. मोरांचा आवाज इतका येत होता की, एकवेळ प्रफुल पटेल काय बोलत आहेत हेच उपस्थितांना समजत नव्हते.