इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळा चीनऐवजी भारतात बनवा – आठवले

मुंबई: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदू मिलमध्ये उभारण्यात येत असून या स्मारकाच्या कामाचा आढावा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय

 मुंबई: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक इंदू मिलमध्ये उभारण्यात येत असून या स्मारकाच्या कामाचा आढावा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.  इंदू मिलमध्ये  उभारण्यात येणारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आणि त्या पुतळ्याचा चबुतरा चीनमध्ये बनविण्याचा निर्णय रद्द करून भारतातच हा पुतळा बनवावा. त्यासाठी शिल्पकार राम सुतार यांची तयारी असून भारतात काही जणांना रोजगार मिळेल. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. अशा परिस्थितीत तेथून पुतळा बनवून घेणे योग्य होणार नसल्याची सूचना रामदास आठवले यांनी केली आहे. 

इंदू मिल आणि चैत्यभूमीच्या दरम्यान समुद्राजवळून रस्ता बनविणे आवश्यक आहे त्यासाठी लागणारी सीआरझेडची पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मी भारत सरकारतर्फे मिळवून देण्यासाठी पुढाकार घेईन. इंदू मिलमध्ये डॉ आंबेडकर यांचा पुतळा आणि पुतळ्याचे फाऊंडेशनचे काम बाकी असून स्मारक कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात स्मारकातील नियोजित विविध हॉलच्या कामापैकी ७० टक्के काम झाले आहे. स्मारकाच्या कामाचे फाऊंडेशनचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. बेसमेंटचे काम ७२ टक्के झाले आहे, अशी माहिती शापुरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापक उमेश साळुंखे यांनी दिली आहे.  या व्हिडिओ कॉन्फरन्स आढावा बैठकीला आर्किटेक्ट शशी प्रभू, एमएमआरडीएचे अधिकारी भांगरे, मनपाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर; आदी मान्यवर उपस्थित होते. इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी १ हजार ८९ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची  हमी एमएमआरडीएने दिली  आहे. या स्मारकाचे काम पूर्ण होण्यास अजून ३ वर्ष इतका कालावधी लागेल. लॉकडाऊनमुळे दोन महिने स्मारकाचे काम बंद होते. तसेच परप्रांतीय मजूर गावी गेल्याने कामगारांची वानवा निर्माण झाली आहे. तरीही युद्धपातळीवर स्मारकाचे काम  सुरू करण्याची हमी अधिकाऱ्यांनी दिली. 

 या बैठकीत चैत्यभूमी येथे दिक्षाभूमी सारखा भव्य स्तूप उभारावा अशी सूचना महापालिकेला रामदास आठवले यांनी केली. दरवर्षी पावसात  चत्यभूमी च्या स्तुपाला हानी पोहोचत असते. काँक्रीट तुटून पडते. त्यामुळे चैत्यभूमीचा स्तूप दीक्षा भूमीसारखा भव्य उभारावा. तसेच चैत्यभूमीजवळ समुद्राच्या दिशेने रस्ता वाढवावा त्यासाठी सध्या उभारलेली भिंत समुद्राच्या दिशेने वाढवावी, अशी सूचना रामदास आठवले यांनी केली.