महिलांवरील अत्याचार वाढले; बलात्कार, विनभंग, अपहरण, छेडछाड आणि हुंडाबळीचे तब्बल १ हजार ७८७ गुन्हे

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांच्या कालखंडामध्ये महिलांवरील अत्याचाराचे तब्बल १ हजार ७८७ गुन्हे घडले असून यामध्ये बलात्काराचे ३१२ गुन्हे घडले, तर अपहरणाचे ३६४ गुन्हे घडले आहेत. मुंबई शहरात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे गुन्हे अधिक घडत असल्याचे समोर आले आहे.

    मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांच्या कालखंडामध्ये महिलांवरील अत्याचाराचे तब्बल १ हजार ७८७ गुन्हे घडले असून यामध्ये बलात्काराचे ३१२ गुन्हे घडले, तर अपहरणाचे ३६४ गुन्हे घडले आहेत. मुंबई शहरात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे गुन्हे अधिक घडत असल्याचे समोर आले आहे.

    देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या दरम्यान अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे तब्बल १८७ गुन्हे घडले असून महिलांवर बलात्कार होण्याचे १२८ गुन्हे घडले आहेत. या बरोबरच अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, तब्बल ३६१ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद मुंबईतील ९४ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे. तर, ३ महिलांच्या अपहरणाच्या घटना मुंबई शहरात गेल्या चार महिन्यांत घडलेल्या आहेत.

    कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन पुन्हा एकदा लादण्यात आलेले आहे. त्यास एक महिना पूर्ण झालेला असून एप्रिल महिन्यात मुंबई शहरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे ४० गुन्हे नोंदविण्यात आले असून, महिलांवर २६ बलात्काराचे गुन्हे मुंबई शहरात घडलेले आहेत. एप्रिल महिन्यात एकूण बलात्काराचे ६६ गुन्हे घडले असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ८७ गुन्हे घडले आहे. तसेच, महिलांच्या अपहरणाचे २ गुन्हे घडलेले आहेत.

    हुंडाबळीचे ६ गुन्हे

    मुंबई शहरात गेल्या ४ महिन्यांमध्ये हुंडाबळीचे ६ गुन्हे नोंदवण्यात आले असून हुंडा न दिल्यामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हुंडा न मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या ३ प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले असून, हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी तब्बल २१४ गुन्हे नोंदवले आहेत. इतर कारणांमुळे तब्बल ८ महिलांचे खून मुंबई शहरात घडले असून, वैयक्तिक व घरगुती कारणांमुळे १४ महिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शारिरीक व मानसिक त्रास देण्याच्या संदर्भात २१ गुन्हे गेल्या ४ महिन्यांत नोंदविण्यात आले असून पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचे १८४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

    विनयभंगाच्या १३४ तक्रारी

    विनयभंगाचे १३४ गुन्हे गेल्या ४ महिन्यांत मुंबई पोलिसांनी नोंदवले असून छेडछाड प्रकरणी १५ गुन्हे पोक्सो अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारचे कृत्य करण्याच्या संदर्भात गेल्या चार महिन्यांत मुंबई शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये ६६० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.