J.P. Attack on Nadda reverberates in Mumbai; BJP leader warns of statewide agitation

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचे मुंबईतही तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत या हल्ल्याचा निषेध नोंदवला.

सायन येथे भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत रास्तारोको केला. त्यामुळे सायन येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाल्याचे वृत्त येताच भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी सायन येथे जोरदार निदर्शने केली.

यावेळी प्रसाद लाड आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन करत घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काही आंदोलकांनी ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले तर काहींनी ममता बॅनर्जी यांच्या फोटोवर शाई फेकून तीव्र निषेध व्यक्त केला.

अचानक शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर जमल्याने सायन येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.  पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळत असल्याने ममता बॅनर्जी या घाबरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. नड्डा यांना झेड प्लस सुरक्षा आहे.

संविधानाच्या मार्गानेच आम्ही बंगालमध्ये प्रचार करत होतो. तरीही आमच्या नेत्यावर हा हल्ला करण्यात आला असून हा देशाच्या संविधानावरील हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली.