डॉक्टरांवर हल्ले; सरकार गंभीर नाही

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णांच्या कुटुंबीयांकडून मारहाण होत असल्याच्या घटना समोर येत असून या मुद्यावरून मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्र सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत गंभीर दिसत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

    मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णांच्या कुटुंबीयांकडून मारहाण होत असल्याच्या घटना समोर येत असून या मुद्यावरून मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्र सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत गंभीर दिसत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

    13 मे रोजी हायकोर्टाने राज्य सरकारला डॉक्टर तसंच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी विचारणा करत किती एफआयआर दाखल केले तसंच त्यांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलली याची माहिती मागितली होती. यासंबंधी राज्य आरोग्य विभागाच्या उपसचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर खंडपीठाने हे मत नोंदवले.

    राज्यभरात एकूण 436 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती यावेळी प्रतिज्ञापत्रात देण्यात आली. मात्र त्यांची विस्तृत माहिती न दिल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत सरकारी वकिलांकडून तपासणी केली जात नाही तोपर्यंत आम्ही प्रतिज्ञापत्र स्वीकारणार नाही, असे कोर्टाने सुनावले.