भालके विरूध्द औताडे मंगळवेढा- पंढरपूर पोटनिवडणुकीत चुरस; राष्ट्रवादीसमोर विजयाचे आव्हान

मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादीकडून या रिक्त जागेवर भारत भालके यांचा मुलगा भगीरथ याची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात भाजपकडून समाधान औताडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

  मुंबई: राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत आघाडी विरूध्द भाजप यांच्यात प्रतिष्ठेचा सामना होत आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे २८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाल्याने मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादीकडून या रिक्त जागेवर भारत भालके यांचा मुलगा भगीरथ याची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात भाजपकडून समाधान औताडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नामांकन अर्ज भरण्याचा उद्या (दि ३०) शेवटचा दिवस आहे. समाधान आवताडे  यांच्या नामांकनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्हा भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहात आहेत.

  औताडेना परिचारकांचा पाठिंबा
  दामाजी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष असणारे समाधान आवताडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र २०१९ मध्ये आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी देखील अपक्ष उतरण्याची आवताडेंनी तयारी केली होती. मात्र आमदार प्रशांत परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

  भालकेंना राष्ट्रवादीतूनच विरोध
  आमदार भारत भालके राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते. त्याच्या अकाली निधनानंतर १७ एप्रिल रोजी  होणा-या पोटनिवडणुकीत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका गटाकडून अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी केली जात होती. मात्र भारत नाना भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. भारत नाना यांचे सुपुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यास सहानुभुतीच्या लाटेवर निवडून येण्याची दाट शक्यता असल्याने आणि सत्तेच्या आकड्यांच्या खेळात राष्ट्रवादीला ही जागा गमावून चालणार नसल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके याच्या कुटूंबियापैकीच उमेदवार देण्यासाठी जोर देण्यात येत होता.

  राष्ट्रवादीत बंडाची शक्यता?
  मात्र त्यामुळे अजित पवार समर्थक कार्यकर्त्याकडून पार्थ पवार यांच्या बंडखोरीचे संकेतही दिले जात होते अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. मात्र या मुद्यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा करून समन्वय साधल्याचे सांगण्यात येत आहे. भारत भालके सलग तिनदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत त्यांनी कॉंग्रेस पक्षातून आमदारकी पटकावली होती. त्यानंतर ते २०१९मध्ये अपक्ष लढले आणि माजी आमदार (कै.) सुधाकर पंत परिचारकांचा त्यांनी पराभव केला होता.

  भालकेंचे विरोधक भाजपवासी
  भालके यांचे राजकीय विरोधक परिचारक आणि विजयसिंह मोहिते-पाटील सध्या भाजपवासी झाल्याने राष्ट्रवादीमधून योग्य उमेदवाराची निवड होणे गरजेचे होते. मात्र पार्थ पवार यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा असा काही कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने पेच निर्माण झाला होता अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली. मात्र राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून अखेर भालके यांच्या सुपूत्राची उमेदवारी जाहीर केली आहे