मुंबईत पावसाची कोसळधार, सलग दुसऱ्या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

१ जूनपासून २१ जुलैपर्यंत कुलाबा येथे १३६६ मिमी आणि सांताक्रूझ येथे १९४३.७ मिमी पावसाची(Rain In Mumbai) नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे कमाल तापमानात ३ अंशांची घट झाली.

    मुंबई : दीर्घकालीन सरासरी (Average Rainfall)ओलांडण्याचा मोसमी पावसाचा(Rain) कल सलग दुसऱ्या महिन्यातही कायम आहे. जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाची सरासरी ८४० मिमी असताना यंदा मात्र १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत  सांताक्रूझ येथे १०३२.२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. याच कालावधीत कुलाबा येथे नोंदवला गेलेला पाऊसही दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास म्हणजेच ७६१.६ मिमी इतका आहे.

    १ जूनपासून २१ जुलैपर्यंत कुलाबा येथे १३६६ मिमी आणि सांताक्रूझ येथे १९४३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे कमाल तापमानात ३ अंशांची घट झाली. दोन्ही ठिकाणी २७.४ आणि २७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

    धरणांतील साठ्यात चार दिवसांत तीन टक्के वाढ

    राज्यभरात ठिकठिकाणी सुरू झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ४ दिवसांत तीन टक्क्यांनी वाढला आहे. शनिवारी राज्यातील धरणांमध्ये ३० टक्के  उपयुक्त पाणीसाठा होता. तो बुधवारी ३३.३९ टक्क्यांवर पोहोचला.