Awareness should be created among farmers about soil testing Agriculture Minister Dadaji Bhuse

जमिनीच्या आरोग्याबाबत संपूर्ण जगात या बाबतचा संदेश पोहचविणे तसेच शेतकरी व समाजात शेत जमिनीच्या आरोग्याबाबत जाणीव जागृती करून देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे आणि त्या वर्षापासून ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस' म्हणून साजरा केला जात आहे.

  • जागतिक मृदा दिन: ग्रामस्तरावर जमीन आरोग्य पत्रिकेचे होणार वाचन

मुंबई : आज ‘जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत जमीन आरोग्य पत्रिकेचे वाचन करुन शेतकऱ्यांना खतांच्या शिफारशीबाबत, जमिनीच्या आरोग्याबाबत खतांच्या संतुलित वापराबाबत कृषी विद्यापीठांच्या (agriculture university) तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. माती परीक्षणाबाबत (soil testing) शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

जमिनीचे आरोग्य बिघडण्याचा धोका लक्षात आल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत २०१५ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. जमिनीच्या आरोग्याबाबत संपूर्ण जगात या बाबतचा संदेश पोहचविणे तसेच शेतकरी व समाजात शेत जमिनीच्या आरोग्याबाबत जाणीव जागृती करून देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे आणि त्या वर्षापासून ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका ही योजना राज्यात कार्यान्वित झालेली आहे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेत जमिनीच्या रासायनिक गुणधर्माची स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. त्यानुसार पिकांना खत मात्रांच्या शिफारसी उपलब्ध होणार आहेत. यामुळे खताच्या संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन मिळणार असून जमिनीचे आरोग्य आबाधित राखण्यास मदत होणार आहे.

यावर्षीच्या जागतिक मृदा दिनी राज्यभर जिल्हा तालुका व गावपातळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपीकता निर्देशानुसार खरीप व रबी हंगामातील प्रमुख पिकांना आवश्यक खत मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) शिफारशीचे फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात प्रामुख्याने जमीन आरोग्य पत्रिकेचे वाचन करुन शेतक-यांना खतांच्या शिफारशीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.