‘आयारामानी’ भाजप बिघडवली खासदार संजय राऊत यांचा भाजपा आणि नारायण राणे यांच्यावर घणाघात

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र दोन्ही राज्ये क्रांतीकारकांची भूमी आहे. मिस्टर नारायण राणे हे बंगालचा आणि महाराष्ट्राचा अवमान करत आहे. बंगाल आणि महाराष्ट्राच्या योगदानाची ज्या मंत्र्याला माहिती नाही, ते आम्हाला स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगत आहेत.

    पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

    शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. गेल्या दोन वर्षापासून अती झालं. महाराष्ट्रात आणि देशात बांग्लादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे. भाजपच्या शुद्धीकरणाची गरज आहे. हा खूप मोठा पक्ष आहे. हिंदुत्वासाठी या पक्षाने मोठं काम केलं आहे. आम्ही २५ वर्षे त्यांच्यासोबत होतो. त्यांचं योगदान आम्ही जाणून आहे. पण ज्यांना हे माहीत नाही, जे बाहेरून आले आहेत, ते लोक शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. देशासाठी बनलेला कायदा आहे. मग ती ईडी असो की सीबीआय असो. आम्ही जे आज लिहिलं. त्यात तथ्य आहे. आणि देशभरात त्यावर मंथन चालेल आणि चालणार, असं ते म्हणाले.

    आता कोणी तरी बाहेरचा माणूस येतो शिवसेना भवनावर दगड मारू म्हणतो, कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारू म्हणतो. हे मूळ भाजपचा माणूस बोलणार नाही, हे बाहेरचे बाडगे बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत. हे सगळे बाहेरून आलेले लोकं आहेत. महाराष्ट्रात, बांग्लादेशातून घुसखोर आणि पाकिस्तानचे घुसखोर हैदोस घालतात आणि आपण त्यांच्याविरोधात कारवाया करतो. महौल बिघडवतात. तसंच भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी माहौल बिघडवत आहेत, असं ते म्हणाले.

    त्यांना इतिहासाचं पुस्तक द्या
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्य दिनाचा हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव समजून सांगण्यासाठी भाजपकडून पत्रं लिहिली जाणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अच्छा पत्रं लिहिणार आहेत. त्यांना लिहिता वाचताही येतं? चांगली गोष्ट आहे. आम्हाला स्वातंत्र्य संग्रामाबाबत सांगायची गरज नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र दोन्ही राज्ये क्रांतीकारकांची भूमी आहे. मिस्टर नारायण राणे हे बंगालचा आणि महाराष्ट्राचा अवमान करत आहे. बंगाल आणि महाराष्ट्राच्या योगदानाची ज्या मंत्र्याला माहिती नाही, ते आम्हाला स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगत आहेत. त्यांनी आधी इतिहास वाचावा. भाजपने त्यांना इतिहासाचं पुस्तक द्यावं, असा टोला त्यांनी लगावला.