वेतन न मिळाल्याने आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : कोरोना विरोधात लढा देत असलेल्या आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांना गेल्या पाच महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यात मुंबई, नागपूर,नांदेड आणि उस्मानाबाद या चार आयुर्वेदिक महाविद्यालयात ५६० निवासी डॉक्टर असून हे सर्व डॉक्टर्स कोरोना महामारीच्या लढ्यात काम करत आहेत. चारही शहरात हे डॉक्टर्स फक्त कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या कोरोना रुग्णसेवे व्यतिरिक्त गरजेप्रमाणे विविध रुग्णालयातील वार्डात कर्तव्य पार पाडत आहेत. असे असतानाही या आयुर्वेदिक निवासी डॉक्टर्सना एप्रिल महिन्यांपासून त्यांचे विद्या वेतन मिळालेले नाही. त्यामुळे राज्य सरकार कोविड योद्धा संबोधून ज्यांचे गौरव करते त्यांना त्यांच्याच हक्काचे विद्यावेतन देण्यास सरकारला कसे काय विसर पडते असा सवाल निर्माण झाला आहे.
राज्यात महामारी संदर्भातला कायदा लागू आहे. डॉक्टर म्हणून आमचे काही कर्तव्य आहे. म्हणून गेले ५ महिने विद्या वेतन न घेता आम्ही मुकाट्याने आपली सेवा देत आहोत. मात्र, विद्यावेतन न मिळताना किती काळ काम करावा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. नुसते कोविड योद्धा संबोधून सरकार किती दिवस काम करून घेणार असा सवाल ते उपस्थित करतात. नुकतच निवासी डॉक्टर्सचे विद्या वेतन राज्य सरकारने दहा हजारांनी वाढवले आहे. मात्र, आयुर्वेदिक निवासी डॉक्टराना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांवरच अन्याय का असा सवाल निवासी डॉक्टरांकडून विचारला जात आहे आहे. राज्य शासनाने जर आमच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही तर लवकरच चारही महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्सना आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल. महामारीच्या संकटात आंदोलन करण्याची आमची मानसिकता नाही. मात्र, सरकार आम्हाला भाग पाडणार असले तर आमच्या पुढे दुसरा पर्याय राहणार नाही असे ही या निवासी डॉक्टर्सनी सांगितले आहे. मात्र आयुर्वेदिक निवासी डॉक्टर्स संदर्भात निर्णय झाला असून मिळालेल्या अनुदानातून विद्यार्थ्यांना मानधन देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर दिली.