मुलांची लसीकरण नोंदणीकडे पाठ, महिनाभरात फक्त ११ मुलांचीच नोंदणी

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु केली. मात्र नोंदणीसाठी मुलांकडून पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. महिनाभरात फक्त ११ मुलांचीच नोंदणी झाली आहे. मुलांसह पालकांनीही लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

  मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु केली. मात्र नोंदणीसाठी मुलांकडून पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. महिनाभरात फक्त ११ मुलांचीच नोंदणी झाली आहे. मुलांसह पालकांनीही लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

  नायर रुग्णालयात जुलै पासून लसीकरण ‘ट्रायल’साठी नोंदणीला सुरुवात झाली. त्यानंतर आठवडाभरात पाच मुलांनी नोंदणी केली. त्यानंतर महिनाभरात आतापर्यंत केवळ ११ मुलांनीच नोंदणी केली. पालिकेच्या नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या पाठपुराव्यानंतर ‘झायडस कॅडिला’ कंपनीने लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. या ‘ट्रायल’मध्ये ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे. यासाठी जुलैपासून नायर रुग्णालयात नोंदणीला सुरू झाली आहे. यामध्ये मुलांना नायर रुग्णालयामध्ये येऊन नोंदणी करावी लागत आहे. या लसीकरणात १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी, २८ व्या दिवशी आणि ५६ व्या दिवशी डोस दिला जाईल. मुलांची नोंदणी झाल्यानंतर तातडीने लसीकरणाची ट्रायल सुरू होणार आहे. दरम्य़ान, नोंदणीला पाठिंबा मिळत नसल्याने लहान मुलांच्या लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावला आहे.

  नोंदणी करण्याचे आवाहन

  लहान मुलांच्या लसीकरणासाठी अनेक पालकांमध्ये गैरसमज व काळजी असल्याने नोंदणीसाठी पालक पुढाकार घेत नसल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. मात्र मुलांची आरोग्य तपासणी तसेच मुले-पालकांच्या शंकांचे निरसन आणि काऊंन्सिलिंग केल्यानंतरच नोंदणी केली जाते, असे नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

  मुंबईत सुमारे २५ लाखांवर मुले

  मुंबईत ६ ते १२ वर्षे वयोगटातील सुमारे २५ लाखांहून अधिक मुले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून या सर्व मुलांचे लसीकरण लवकर होणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरणासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. यासाठी ‘ट्रायल’ वेळेत व्हायला हवे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.