आयसोलेशन केंद्रातील रुग्ण, डॉक्टर परिचारिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण

मुंबई :क्वारंटाईन केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारीनंतर आयसोलेशन सेंटरमधील रुग्ण, डॉक्टर व परिचारिका यांना दिल्ली दरबार या हॉटेलमधून जेवण पुरवण्याचा निर्णय

 मुंबई : क्वारंटाईन केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारीनंतर आयसोलेशन सेंटरमधील रुग्ण, डॉक्टर व परिचारिका यांना दिल्ली दरबार या हॉटेलमधून जेवण पुरवण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र गेले काही दिवस या हॉटेलमधील जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे.  त्यामुळे रुग्ण, कर्मचारी व डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबईमध्ये सापडणाऱ्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था पालिकेने विविध हॉस्पिटलमध्ये केली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष आयसोलेशन सेंटर काही हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले आहेत. या आयसोलेशन सेंटरमधील रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांना मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल दिल्ली दरबारमधून जेवण मागवण्यात येत आहे. सुरुवातीला उत्तम दर्जाचे येत असलेल्या जेवणाचा दर्जा काही दिवसांपासून खालावला असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण त्यांना मिळत आहे. काही वेळेला पुलावच्या नावाखाली फक्त भातच रुग्णांसह सर्वांना देण्यात येत आहे. त्यासोबत डाळ, भाजी किंवा रायता असे कोणतेच पदार्थ देण्यात येत नसल्याने रुग्ण, डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नुसताच भात खावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.  यामध्ये मधुमेहाच्या रुग्णांनाही नुसता भात देण्यात येत आहे.  कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे समोर येत असताना पालिकेकडून डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्या आरोग्याशी खेळ मांडला असल्याच्या आरोप करण्यात येत आहे. आम्हाला उत्तम दर्जाचे जेवण मिळाल्यास आमची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होईल, परंतु निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यास आमचे आरोग्य खालावून रोग प्रतिकरकशक्ती कमी होऊन आम्हाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी सांगितले.