भूमिपूजनाच्या या मंगलप्रसंगी बाळासाहेब ठाकरे हवे होते – राज ठाकरे

  • तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्रगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत. आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आहे.

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर भावनिक पत्र शेअर केले आहे. राज ठाकरेंनी या पत्रात अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या मंगलप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते. अशी भावना व्यक्त केली आहे. तसेच अयोध्या नगरीमध्ये राम मंदिर उभं राहाव यासाठी मोदी सरकारकडून करण्यात आलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. असे राज ठाकरे म्हणाले आहेत. आपल्या रामाचा वनवास संपला तसेच राम मंदिराचे अयोध्येत भूमिपूजन होणार असे राज ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरे म्हणाले की, जवळपास ३ दशकांचा संघर्ष, त्यासाठी शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला आहे. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. 

अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्त्व वेगळं आहे. 

तसेच तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्रगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत. आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. 

ह्या मंगलमय क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाह. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता. सध्या देशात कोरोनाचं संकट आहे. पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यावधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करुन भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.