बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची घाई, आमंत्रण न दिल्याने विरोधकांचा संताप

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(balasaheb thakre) यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम(thakre memorial bhumipujna program) घाईने उरकला जात असल्याबाबत विरोधी पक्षांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिवाय अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने संतापही व्यक्त केला जात आहे. 

    मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(balasaheb thakre) यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम(thakre memorial bhumipujna program) घाईने उरकला जात असल्याबाबत विरोधी पक्षांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिवाय अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने संतापही व्यक्त केला जात आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या स्मारकासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या होत्या. मात्र त्यांनासुद्धा बोलावण्यात आलेले नाही. यापेक्षा आणखी काही दुर्दैव असू शकत नाही. भूमिपूजन सोहळ्याला विरोधकांना न बोलावल्याने राज्य सरकारला विरोधी पक्षनेत्यांना किंमत द्यायचीच नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

    राज ठाकरेंनाही निमंत्रण नाही
    दरेकर म्हणाले की, बाळासाहेबांचा व्यंगचित्राचा वारसा पुढे नेणारे राज ठाकरे त्यांच्याच घरातले असूनसुद्धा त्यांना कार्यक्रमाला बोलावले गेले नाही. नगर विकास मंत्री, ज्यांच्या खात्याकडून हे काम होणार आहे, त्या एकनाथ शिंदे यांना सुद्धा बोलावले गेले नाही. प्रश्न मान, अपमानाचा नाही प्रश्न कोत्या मनोवृत्तीचा आहे. बाळासाहेबांसमोर मान-अपमानाची गोष्ट फारच छोटी आहे, कारण त्यांच्या उंची एव्हढे महाराष्ट्रात कुणी नाही. त्यांच्या विचारांमुळेच मी आज आहे, मला बोलावले असते तर आनंद झालाच असता, परंतु वरातीमागून घोडे नाचवण्यात मजा नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.

    छापील आमंत्रण कोणालाही नाही

    भूमिपूजन सोहळ्याचे छापील आमंत्रण कोणालाही नाही, आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री  अनिल परब यांनी दिली आहे. ते म्हणाले की, “हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, शिवजयंतीचा मुहूर्त साधून हे भुमीपूजन केले जात आहे.  शिवराय आमचे दैवत त्यांच्या जयंतीला भुमीपूजन हे छत्रपती शिवाजी महाराजांची पुजाच आहे. त्यासोबतच आमचे दुसरे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे ही आज भूमिपूजन होत आहे. त्यामुळे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांच्या या वास्तूमुळे त्यांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राच्या जनतेलाही कळणार आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांचे भव्य स्मारक होऊ घातले आहे. हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, असेही अनिल परब म्हणाले.