शांतता ! टीआरपी सुट्टीवर जातायत!
शांतता ! टीआरपी सुट्टीवर जातायत!

सध्या देशभर गाजत असलेल्या टीआरपी घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर १२ आठवडे टीआरपी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

वृत्तवाहिन्यांच्या दुनियेतील परवलीचा शब्द असणारा टीआरपी (TRP) आता तीन महिने सुट्टीवर चाललाय. बहुचर्चित टीआरपी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बार्क (Broadcast Audience Research Council) संघटनेनं हा निर्णय जाहीर केलाय.

टीआरपी मोजण्याच्या यंत्रणेत काय सुधारणा करता येतील, याबाबत आम्ही विचार करणार आहोत. ही यंत्रणा अधिक पारदर्शक आणि व्यापक होण्यासाठी काय करता येईल, याचा विचार या १२ आठवड्यांत होणार आहे.

बार्क (Broadcast Audience Research Council)

१२ आठवड्यांसाठी टीआरपी मोजला जाणार नाही, असं बार्कनं म्हटलंय. बार्क ही भारतातील उपग्रह वाहिन्यांचा टीआरपी मोजणारी एकमेव संघटना आहे. या निर्णयामुळे आता दर आठवड्याला जाहीर होणारा वृत्तवाहिन्यांचा टीआरपी तीन महिने मोजला जाणार नाही.

टीआरपी मोजण्याच्या सध्याच्या पद्धतीत काय बदल आणि सुधारणा करता येतील, याबाबत तीन महिने खल होणार आहे. “तीन महिन्यांसाठी टीआरपी बंद होणार आहे. मात्र राज्य आणि भाषावर घेतला जाणारा प्रेक्षकसंख्येचा अंदाज जाहीर करण्याचे काम सुरू राहिल” असेही बार्कच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.

न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशन (NBA) नं या निर्णयाचं स्वागत केलंय. योग्य दिशेनं टाकलेलं हे पाऊल असल्याची प्रतिक्रिया एनबीएनं दिलीय. “या बारा आठवड्यांच्या काळात बार्कनं आपल्या यंत्रणेत मुलभूत सुधारणा कराव्यात आणि आकडेवारीची विश्वासार्हता वाढण्यासाठी प्रयत्न करावेत” असं एनबीएनं म्हटलंय.

बार्क ही संघटना काय करते?

देशातील सर्व उपग्रह वाहिन्यांचे टीआरपी मोजणारी बार्क ही एकमेव संघटना आहे. वाहिन्या, जाहीरात कंपन्या आणि जाहीरातदार या सर्वांचं प्रतिनिधित्व ही कंपनी करते.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट. थोडक्यात, कुठली वाहिनी, कुठल्या दिवशी, किती वेळ पाहिली गेली याचं मोजमाप म्हणजे टीआरपी. देशाच्या विविध भागात टीआरपी मोजण्यासाठी मीटर्स लावण्यात येतात. तांत्रिक भाषेत यांना बॅरोमीटर्स असं म्हटलं जातं. ज्यांच्या टीव्हीला असे बॅरोमीटर्स जोडले गेलेत, त्यांना याची कल्पना देण्यात येत नाही. अफरातफर टाळण्यासाठी ही माहिती गोपनीय ठेवण्यात येते. शहर, निमशहर, ग्रामीण अशा विविध विभागात हे बॅरोमीटर बसवण्यात येतात. देशभरात असे ३० हजार तर मुंबईत २ हजार बॅरोमीटर्स वापरून टीआरपी मोजला जात असल्याची माहिती बार्कनं दिली आहे.

टीआरपी घोटाळा कसा झाला?

काही वृत्तवाहिन्यांनी ज्यांच्या घरात बॅरोमीटर्स लावण्यात आले आहेत, अशा कुटुंबांचा शोध लावून त्यांना विशिष्ट वाहिनी पाहण्यासाठी पैसे दिल्याची बाब समोर आली. हंसा रिसर्च नावाची संस्था बार्कसाठी काम करते. या संस्थेतील काही आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या सहभागाने हा घोटाळा झाल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येतीय. त्यादृष्टीनं संशयित कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यांच्या घरी बॅरोमीटर्स आहेत, त्यांना पैसे देऊन विशिष्ट वाहिनी पाहायला सांगण्यात आलं. परिणामी त्या वाहिनीचा टीआरपी वाढला. याचा फायदा त्या वाहिनीला झाला, असा आरोप आहे.