भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. करोनाच्या नव्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आताही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे यांसारखी सावधानी न पाळल्यास करोना पुन्हा येईल, असा इशारा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला.

    मुंबई (Mumbai). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. करोनाच्या नव्या उद्रेकामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आताही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे यांसारखी सावधानी न पाळल्यास करोना पुन्हा येईल, असा इशारा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला. तसेच प्रत्येकाने चांगल्या सवयी लावून घेतल्यास करोनाचा पराभव निश्चित आहे. केरळ व महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात करोना संकट काळात सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवक तसेच अभेद फाउंडेशनचे अध्यक्ष राजन किणे यांच्या पुढाकाराने करोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनिता राजन किणे उपस्थित होत्या. याप्रसंगी कोश्यारी यांनी हा इशारा दिला.

    कोरोना संकटात समाज एकवटला
    राज्यात कोरोनाचं संकट निर्माण झालं तेव्हा राज्यातील सर्व लोकांनी परस्पर सहकार्याने काम केले. एक दुसऱ्याला मदत केली. डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक यांनी तर उत्तम काम केलेच परंतु या काळात विविध सरकारी विभागांनी उल्लेखनीय काम केले, असं कोश्यारी यांनी आवर्जून सांगितलं. करोना संसर्गाच्या काळात लोकांनी पोलिसांवर पुष्पवर्षाव केला ही अनोखी घटना या काळात पाहायला मिळाली, असंही त्यांनी नमूद केलं.

    तर कोरोनाचा पराभव निश्चित
    ईश्वर केवळ मंदिर, मस्जिद व इतर धार्मिक स्थळांपुरता मर्यादित नसून तो सर्व जनाजनात वास करीत आहे, हे जाणून लोकांनी या काळात भगवान बुद्ध व महात्मा गांधींचा करुणा भाव जागविला. लोकांमधील सेवा, समर्पण व करुणा भाव टिकून राहिला तर करोनासारखी कितीही संकटे आलीत तरीही त्यांचा निश्चित पराभव होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.